Thursday, February 21, 2013

देव दिवाळी !!!

देव दिवाळी !!!

 देव दिवाळी साठी गावाला जायचं ठरलं. म्हणून  सकाळची मांडवी पकडली  आणि संगमेश्वर ला पोहोचलो. त्या दिवशी घरीच राहायच होत. संध्याकाळी देवाची पूजा केली आणि  फटके फोडले.

दुसऱ्या दिवशीचा प्लान मात्र आधीच ठरला होता. सकाळी लवकर निघायचं आणि गणपतीपुळ्याला आणि मार्लेश्वर ला जायचं. तसं  लवकर निघायचं होत पण कसलं जमतंय. निघे  पर्यंत १० वाजले. दिवसभर गाडी घेतली होती भाड्याने. फक्त गाडीच कारण उदय काकाच गाडी चालवणार होते. घरच्याच झाडाची जास्वंदाची फुले घेतली होती. वाटेत जाम भूक लागली होती म्हणून काकांनी एका हॉटेल मध्ये नेले. हॉटेल सन राइस .... मस्त मिसळ पाव हाणला आणि पुढे निघालो.

अंतर फक्त २ तासाचच होत. पण मधेच गाडी बंद पडली ती पण चढणावर ..... मग काय सगळ्यांचीच कसरत. काका गाडी सुरु करण्याचा प्रयत्न करत होते, मी आणि भावेश तिला धक्का मारण्याचा !!!  प्रयत्नच होता तो कारण जसे काका क्लच सोडायचे गाडी मागे जायची. मग आम्हीपण तिच्या बरोबर मागे मागे ....  मी गाडीवाल्यावर थोडी शाब्दिक  फुले उधळली (पण मनातच) ... पण काकांनी शेवटी सुरु केली गाडी एकदाची. आणि निघालो पुढच्या प्रवासाला.

गणपतीपुळ्याला पोहोचे पर्यंत १ वाजून गेला होता. देवाचे दर्शन मस्त झाले. जेवायची वेळ झाली होती म्हणून हॉटेल मधे जाणार होतो तर काका म्हणाले  इथे गुरुजींकडे अप्रतिम जेवण मिळत. काकांच्या ओळखीचे एक गुरुजी होते. त्या बापट गुरुजींकडे जेवलो.  सुंदर..... खरच अप्रतिम जेवण होत. आमटी भात, पोळी , भाजी . मोदक आणि त्यावर तुपाची धार. व्वा !!!. काय मोदक होते ते !!!

पुढचा टप्पा होता मार्लेश्वर .... पण संगमेश्वर ला  थोडी खरेदी पण करायची होती. म्हणून प्लान चेंज  केला आणि संगमेश्वर ला आधी गेलो.  संगमेश्वरचा  फरसाण खूप मस्त मिळतो.  तो घेतला.  मुंबई ला पण आणायचा होता तसं दादाने सांगितलं  होत कारण गेल्यावेळी आणला होता तो त्याला खूप आवडला होता.

आणि मग निघालो मार्लेश्वरला .... वाटेत सोळजाई च दर्शन घेतलं. मार्लेश्वर ला जाई  पर्यंत संध्याकाळचे  ६ वाजले. काळोख पण झाला होता. मार्लेश्वाराचे देऊळ डोंगरावर आहे. तस ते देऊळ नाही. एका गुहेत शंकराची पिंडी  आहे. चढायला निघालो तो पर्यंत तर वाटेतली दुकाने पण बंद झाली होती. जवळ जवळ ६०० पायऱ्या आहेत. आम्ही वर जाणारे शेवटचेच होतो. मार्लेश्वराचे दर्शन घेतले. असा म्हणतात की कधीतरी त्या गुहेत नाग पण दिसतो. आम्हाला नाही दिसला.

आमच दर्शन झाल आणि पुजाऱ्याने देऊळ बंद केल. तिथल्याच एका माणसा बरोबर खाली येत होतो. त्याला विचारले, "पायऱ्यांवर स्ट्रीट लाईट आहेत पण मग चालू का नाहीत."  त्याने माहिती दिली की ते माकडांनी फोडले आहेत. आम्ही त्याला बोललो "आम्हाला तर नाही दिसली माकडं." भक्ती आणि प्रियांका थोड्या घाबरल्या माकडं म्हटल्यावर . मग तो म्हणाला "रात्री माकडं नाही येत कारण त्यांना वाघाची भीती असते,"  हे असं कारण सांगतात का कोणी. आम्ही घाबरल्याचे दाखवत नव्हतो पण थोडे घाबरलोच होतो.

तिथून थेट घरी गेलो. आणखी दोन दिवस गावालाच आराम केला आणि नंतर पुन्हा मुंबईच्या प्रवासाला सुरुवात केली.

No comments:

Post a Comment